गुटखा तस्कर हादरले : पाचोर्‍यात 22 लाखांचा गुटखा जप्त : दोघा आरोपींना अटक


Gutkha worth Rs 22 lakh seized in Pachora : Two accused arrested पाचोरा (2 मार्च 2025) : पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरखेडी नाका भागात नाकाबंदी दरम्यान रात्री गुटख्याची वाहतूक करणार्‍या वाहनावर पोलिसांनी कारवाई करीत 22 लाखांचा गुटखा जप्त केला तसेच आठ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त केले. दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली. या दोघांची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली. मंगळवार, 1 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
वरखेडी नाका भागात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, हवालदार राहुल काशिनाथ शिंपी, हवालदार समीर बापुराव पाटील, कॉन्स्टेबल सुनील आनंदा पाटील हे रात्री 1 ते पहाटे चारच्या दरम्यान नाकाबंदी करीत होते. यावेळी जामनेरहून पाचोर्‍याकडे एक वाहन येताना दिसले. या वाहनावर पोलिसांना संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला. वाहनावरील चालक हा त्याचे वाहन पळवून नेत असताना त्यास थांबवून नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दत्तू लालदास बैरागी ( 21, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगाव) असे सांगितले.


चालकास वाहनात (एम.एच.-52/0034) काय माल आहे, याबाबत विचारणा करता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली असतात्यात 22 लाख रुपये किमतीचे गुटख्याचे पोते आढळले. हे वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चालक दत्तू लालदास बैरागी (31, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगाव) व मालक सनी टेकचंद पंजाबी ( 35, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) यांना अटक करुन पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन्ही आरोपींची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश विलासराव भदाणे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ समीर बापुराव पाटील, कॉन्स्टेबल सुनील आनंदा पाटील आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !