भरधाव वाहनाच्या धडकेत युवक जखमी : वाहन चालकाविरोधात गुन्हा
जळगाव (2 एप्रिल 2025) : भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात हर्षल दिलीप बिर्हाडे (रा. आंबेडकरनगर, आसोदा) हा युवक गंभीररीत्या जखमी झाला. शुक्रवारी (14 मार्च) रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास ही घटना आसोदा रोडवर घडली होती. याप्रकरणी तक्रारीनुसार सोमवारी (31 मार्च) तालुका पोलीस ठाण्यात अपघाताला कारणीभूत वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हर्षल बिर्हाडे हा युवक पल्सर (एम.एच.19 बी.पी.2923) दुचाकीने जात होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चालकाने वेगात ताब्यातील वाहन आणत पल्सरला जोराने धडक दिली. या अपघातात हर्षल हा दुचाकीवरून रस्त्यावर पडला व गंभीर जखमी झाला. युवक जखमी झाल्याचे पाहिल्यानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला. ही घटना आनंदा महाजन यांच्या मळ्यासमोर रोडवर घडली होती. प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत जखमी युवकाला रुग्णालयात हलविले. या प्रकरणी दिलीप गोकुल बिर्हाडे (वय 50, रा.आसोदा) यांच्या तक्रारीवरून चालकावर गुन्हा दाखल झाला. पोलीस नाईक नरेंद्र पाटील हे तपास करीत आहेत.





