रेल्वेत नोकरीच्या आमिषाने 13 उकळले : नियुक्तीचा आदेश डीआरएम कार्यालयात सादर करताच जळगाव, नाशिकच्या भामट्यांचे बिंग उघडकीस
जळगाव (3 एप्रिल 2025) : भामट्यांनी रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने 13 लाख उकळले व अपॉईमेंट लेटर दिले मात्र ही नियुक्तीपत्रच बनावट निघाल्यानंतर फसवणूक झाल्याची खात्री होताच तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरोधात गुन्हा दाखल
सेवानिवृत्त कर्मचारी गोकूळ युवराज पाटील (60, रा. पिंप्राळा) यांची 13 लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी संजय नथ्थू कोळी (रा.जैनाबाद, जळगाव), राम नारायण नेवाडकर (रा. सिडको, नाशिक) व सतीश गोकूळ पाटील (रा. जुनोने, ता. अमळनेर) यांच्याविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झालेले गोकूळ पाटील यांची मुलगी दीपाली हिचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे. तिला नोकरी मिळावी या करीता सेवानिवृत्त कर्मचारी गोकुळ पाटील हे प्रयत्न करीत होते. मार्च 2023 मध्ये त्यांचे त्यांचे भाऊ मधुकर पाटील यांनी त्यांचे मित्र संजय कोळी याच्याशी भेट घालून दिली. तुमच्या मुलीला नोकरी लावून देण्याविषयी कोळी याने पाटील यांना सांगितले. मात्र त्या करीता 13 लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर अमळनेर तालुक्यातील जुनोने येथे राहणारा त्याचा मित्र सतिष पाटील याच्याशी देखील त्याने बोलणे करुन दिले होते. नोकरीच्या कामासाठी सतीश पाटील व गोकूळ पाटील यांनी नाशिक येथे राम नेवाडकर याची भेट घेतली असता त्याने मुलीला भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप सी या पदावर नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखविले. नंतर त्यासाठी 13 लाख रुपये देण्यासाठी वेळोवेळी फोन करून पैशाची मागणी केली होती.
ऑर्डर आल्यानंतर बँक खात्यासह रोखीने दिली रक्कम
टपालद्वारे नोकरीची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये 30 जून ते दि. 5 जुलै 2023 दरम्यान संपूर्ण कागदपत्रांसह मुंबई येथे हजर राहण्याचे कळविण्यात आले. ऑर्डर मिळाल्यानंतर दि. 18 मे 2023 रोजी सतीश पाटील याच्या खात्यावर पाच लाख व दि. 25 मे 2023 रोजी मेवाडकर याच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठविण्यासह सतीश पाटील याला रोख दोन लाख रुपये दिले.
पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने दिली पोलिसात तक्रार
फसवणूक करणार्यांसोबत वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. तसेच पैसे परत मागितले असता आज देतो, उद्या देतो, असे सांगू लागले मात्र रक्कमही परत मिळत नसल्याने गोकूळ पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय कोळी, राम नेवाडकर, सतीश पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहे.




