वैमनस्य काढण्यासाठी रिक्षेत टाकला कट्टा : जळगावातील आरोपींना पोलिसांकडून बेड्या
जळगाव (3 एप्रिल 2025) : रिक्षा चालकासोबतच्या वैमनस्यातून त्याच्या वाहनात पिस्टल व काडतूस टाकणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली. नितीन व ऋषिकेश उर्फ बंटी बापू चित्ते (20, रा.कुसुंबा) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
काय घडले जळगावात
जळगावातील नेरी नाका येथे 28 मार्च रोजी एका रिक्षा चालकाच्या रिक्षातून देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस सापडले होते. रिक्षा चालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी, 3 मार्च रोजी दुपारी तीन वाजता संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे

28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता नेरी नाका येथे रिक्षा (एम.एच.19 सी.डब्ल्यू.6108) ची तपासणी केली असता त्यात देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी रिक्षा चालक राहुल रंगराव पाटील (रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना राहुल पाटील आणि नितीन वसंत तायडे (25, रा. कुसुंबा) यांच्यातील वादाची माहिती मिळाली. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून नितीन तायडेने राहुल पाटील यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला. नितीन तायडेने त्याचा मित्र ऋषिकेश उर्फ बंटी बापू चित्ते 20, रा.कुसुंबा) याच्या मदतीने हा कट रचला.
नितीनने ऋषिकेशला पिस्टल व काडतूस दिले आणि ते राहुल पाटील यांच्या रिक्षात लपवण्यास सांगितले. ऋषिकेशने 28 मार्च रोजी रात्री दोन वाजता राहुल पाटील यांच्या घराजवळ जाऊन पिस्टल रिक्षात ठेवले. त्यानंतर ऋषिकेशने एका हॉटेल चालकाला राहुल पाटील यांच्या रिक्षात पिस्तूल असल्याची माहिती दिली. हॉटेल चालकाचा मित्र पोलीस असल्याने त्याने पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलिसांनी राहुल पाटील याच्यावर कारवाई केली.
रिक्षा चालकाला मिळाला जामीन
पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून नितीन तायडे आणि ऋषिकेश चित्ते यांना अटक केली आहे. या दोघांविरुद्ध खोटा पुरावा तयार करून राहुल पाटील यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, राहुल पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




