ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने आठ महिलांचा मृत्यू
Eight women die after tractor falls into well नांदेड (4 एप्रिल 2025) : मजुरांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ महिलांचा मृत्यू झाला.
नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात शुक्रवारी सकाळी सात वाजता घडला. मयत महिला मजूर हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या.

याबाबत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 महिला व एक पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव (जि.नांदेड) शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. या मजुंरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे. यातील 2 महिला आणि एक पुरुष बचावले आहेत.
मृतांमध्ये चोतराबाई माधव पारधे (45), सिमरन संतोष कांबळे (18), सपना राजू राऊत (25), ज्योती इरबाजी सरोदे (35), सरस्वती लखन बुरूड (25), ताराबाई सटवा जाधव (35), धुरपता सटवा जाधव (18) यांचा समावेश आहे. या अपघातात पुरबाबाई संतोष कांबळे, पर्वताबाई रामा बुरुड, सटवा जाधव यांना विहीरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
घटनास्थळावर गुंज येथील गावकर्यांनी मोठी गर्दी केली आहे. तर विहिरीत पडलेल्या महिलांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश सुरु केला आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण गंभीर झाले असून प्रत्येकाच्याच डोळ्यातून आश्रू वाहू लागले आहे.




