कायमस्वरूपी रोजगारासह थकीत वेतन अदा करा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची मागणी
भुसावळ (4 एप्रिल 2025) : राज्य शासनाने महाराष्ट्रातील सुशिक्षीत पदवीधर बेरोजगार विविध क्षेत्रातील तरुणांना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आरोग्य, शिक्षण विभागांसह इतरही विभागात संधी दिली आहे. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गरजेची बाब म्हणून प्रशिक्षित प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगारासह थकीत वेतन अदा करण्याची मागणी पालक वर्गासह प्रशिक्षणार्थ्यांकडून केली जात आहे.
आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त
आरोग्य विभागासारख्या महत्त्वाच्या विभागात अनेक जागा रिक्त असून अशा ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी फार्मसी क्षेत्रातील शिक्षण घेऊन प्रशिक्षीत झालेले आहेत. त्यांना या ठिकाणी वाढीव रोजगार उपलब्ध करून दिल्यास आरोग्य विभागातील सेवेवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. राज्य शासनाने लाडकी बहिण योजना, एस.टी. प्रवास सवलती, शेतकरी आत्म सन्मान योजना सुरू केली आहे. यासह इतरही लाभाच्या योजना सुरू केल्या आहेत. सुशिक्षीत बेरोजगार आहे त्या जागेवर मुख्यमंत्री योजनेंतर्गत काम करायला तयार असून काम केल्यावर मोबदला घेणार आहे. शासनाच्या काही योजनांमध्ये सरसकट मानधन दिले जाते. प्रत्यक्ष काम करणार्यांना कालावधी वाढवून दिल्यास आरोग्य विभागावर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल.

तर बेरोजगारी कमी होणार
पदवीधर तरुणांची आरोग्य व शिक्षण विभागांमध्ये गरज पाहता त्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी आहे. या ठिकाणी सेवाशर्तींमध्ये उपलब्ध करून द्यावी तसेच आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अशा महत्त्वाच्या गरजेच्या ठिकाणी जे पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त
आरोग्य विभागातील सोयी सुविधांची गरज खेड्या-पाड्यापासून ते शहरापर्यंत अत्यावश्यक बाब म्हणून गणली जाते आणि अशा ठिकाणी अनेक जागा रिक्त असल्याचे दिसून येते. अनेक फार्मसी शिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी तालुक्यासह जिल्हाभरात कार्यरत आहेत. आरोग्य विभागातील रिक्त जागांची गरज पाहता त्यांना कालावधी वाढवून कायमस्वरूपी रोजगार देण्याची गरज आहे. कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न, बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल व जनतेलाही आरोग्य, शिक्षण विभागाच्या सोयी उपलब्ध होण्यास मदत होईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत सहा महिन्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य, शिक्षण विभागातील पदवीधरांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी आहे त्या जागेवर नियमित सेवेत उपलब्ध करून देण्याचे आश्वासीत करावे त्याचबरोबर त्यांचे थकीत वेतन अदा करावे, अशी अपेक्षा पालकांसह प्रशिक्षणार्थी वर्गातून केली जात आहे.






