मनपाच्या 43 जन्म-मृत्यू दाखल्यांवर चक्क तहसीलदारांच्या बनावट सह्या
दोन्ही संबंधित विभाग स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
जळगाव (5 एप्रिल 2025) : एकीकडे बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्मदाखल्यांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवल्याचे प्रकार समोर येत असताना जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने भयावह असलेल्या प्रकार समोर आला आहे.
मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने दिलेल्या तब्बल 43 दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले जारी करण्यात आलेले असून, महापालिका आणि तहसीलदार कार्यालयाकडून स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात दहा ते बारा दिवसांत 50 प्रकरणे दाखल झाली होती, त्यात 49 जन्मदाखले आणि 1 मृत्यू दाखला होता. तपासणीदरम्यान तहसीलदारांच्या सहीबाबत शंका निर्माण झाली. चौकशीदरम्यान, फक्त 7 दाखल्यांवर खर्या सह्या असल्याचे स्पष्ट झाले, तर उर्वरित 43 दाखल्यांवर बनावट सह्या आढळल्या.


