15 हजारांची लाच भोवली : जळगावातील अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


Bribe of Rs 15,000 taken : Additional District Health Officer of Jalgaon caught by ACB जळगाव (5 एप्रिल 2025) : जिल्हा परिषदेच्या प्रतिनियुक्ती झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍याला कार्यमुक्त करण्यासाठी जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांच्या (डीएचओ) नावाने 30 हजारांची मागणी करून 15 हजारांची लाच घेताना जळगाव जिल्हा परिषदेतील अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.जयवंत जुलाल मोरे (46, जळगाव) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. या कारवाईने जिल्हा परिषदेतील लाचखोर पुरते हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
44 वर्षीय तक्रारदार हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झाली असून त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायकर यांच्या मार्फतीने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर करण्यासाठी आरोपी डॉ.जयवंत मोरे याने डॉ. सचिन भायकर यांच्या नावे 30 हजारांची लाच मागणी केली होती. 3 रोजी या संदर्भात तक्रार देण्यात आली होती. त्यावरून 3 व 4 रोजी लाच पडताळणी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा लाच स्वीकारताच डॉ.मोरे यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून लाच रकमेसह तीन हजार 700 रुपयांची रोकड व मोबाईल जप्त करण्यात आला.

डॉ.सचिन भायकरांची कसून चौकशी
30 हजारांची लाच जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन भायकर यांच्या नावाने मागण्यात आल्यानंतर एसीबीने त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. एसीबीकडून या संदर्भात पुरावे जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार महाजन, कॉन्स्टेबल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !