बडनेरा मेमूला वरणगावसह बोदवडला थांबा : भुसावळ कॉर्ड लाईनीवर प्लॅटफॉर्म होण्याची शक्यता

मंत्री रक्षा खडसे यांनी घेतला रेल्वेच्या विकास कामांचा आढावा


Badnera Memula to stop at Bodwad along with Varangaon : Possibility of a platform on Bhusawal Cord Line भुसावळ (7 एप्रिल 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात झालेल्या विकासकामांचा आणि भाविष्यात होणार्‍या कामांचा आढावा युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी डीआरएम ईती पाण्डेय यांच्याकडून आयोजीत आढावा बैठकीत शनिवारी घेतला. उच्चस्तरीय बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित विविध रेल्वे प्रकल्पांची माहिती घेतली.

बडनेरा मेमूला बोदवडसह वरणगावात थांबा
डीआरएम कायालयात झालेल्या या बैठकीला डीआरएम ईती पाण्डेय यांच्यासह सर्व वरिष्ठ विभागीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत डीआरएम पांडे यांनी विभागात सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा विकासकामांची सविस्तर माहिती राज्यमंत्री खडसे यांना दिली. यामध्ये प्रवासी सुविधांचा विकास, कामांमधील सुधारणा आणि स्टेशन विकासावर विशेष भर देण्यात आला. बैठकीत दोन महत्त्वाच्या गाड्यांना नवीन थांब्यांना मंजुरी देण्यात आली. बडनेरा-नाशिक मेमूला बोदवड आणि वरणगाव स्थानकावर तर मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे. तसेच अमरावती एक्स्प्रेसमध्ये (12112) आरक्षणासाठी बर्थ वाढविण्यात आले आहेत. अमरावती येथून सुटणार्‍या या गाडीत एसी फस्ट व एसी टुसाठी 12 आणि स्लीपरसाठी 30 अतिरिक्त बर्थ तसेच भुसावळ येथून चार स्लीपर बर्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अशी झाली कामे
बिस्वा ब्रीजचे काम 1 मार्च 2025 रोजी पूर्ण झाल्याची माहितीही देण्यात आली. दुसखेडा स्टेशनजवळील झाडझुडपे हटविणे आणि अप्रोच रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. भादली आणि बोदवड येथील आरयुबी मध्ये प्रकाश योजना कार्यान्वित झाली आहे, तर सावदा रेल्वे उड्डाणपुलावर चोरीमुळे खराब झालेले दिवे नव्याने लावले.पाचोरा-जामनेर-बोदवड रेल्वे मार्गावरील पहुर स्थानकावर मालधक्का उभारणीला मंजुरी मिळाली.जालना-जळगाव रेल्वे मार्गाला 30.5 मीटर रेल ओव्हर रेलच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. सध्या सुमारे 1500 केळी कंटेनर रस्तेमार्गे वाहतूक होत आहेत. कर्मचारी कल्याणासाठी स्थानांतर विनंती प्रकरणांचा आढावा घेण्यात आला असून, विभागाच्या त्वरित कारवाईबद्दल मंत्री खडसे यांनी समाधान व्यक्त केले.

कॉर्डलाईनीवर फलाटाचा प्रस्ताव
भुसावळ येथील कॉर्ड लाईनवर नवीन प्रवासी प्लॅटफॉर्म उभारणीचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला असून कवच आणि इतर सुरक्षा सुविधांसाठी भुसावळ येथे नवीन कंट्रोल कमांड सेंटर उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. मेमू गाड्यांच्या देखभाल सुविधेसाठी ऑगस्ट 2021 मध्ये मंजूर झालेल्या कामात निरीक्षण पीट, हेवी रिपेअर शेड आणि कर्मचारी सुविधांचा समावेश असून, हे काम यंदा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंत्री रक्षा खडसे यांनी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्यात. प्रवासी सुविधा आणि पायाभूत विकासावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. बैठकीस एडीआरएम सुनील कुमार सुमन, एम. के. मीणा आणि सर्व वरिष्ठ विभाग प्रमुख उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !