भुसावळचा पाणीप्रश्न सुटला : हतनूर धरणातून अखेर 700 क्युसेकने आवर्तन सुटले

गुरुवारपर्यंत पालिकेच्या बंधार्‍यात येणार पाणी : दीपनगर रेल्वेसह भुसावळ शहराला लाभ


Bhusawal water problem solved : 700 cusecs of water finally released from Hatnur dam भुसावळ (8 एप्रिल 2025) : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापी बंधार्‍यातील जलसाठ्याने तळ गाठला होता. यामुळे हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यास शहरावर पाणी कपातीची भीती होती मात्र हतनूर धरणातून अखेर 700 क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाई टळली आहे. गुरुवार, 10 एप्रिलपर्यंत हे आवर्तन बंधार्‍यात पोहोचण्याची आशा आहे.

पाणीपुरवठा राहणार सुरळीत
भुसावळ शहर आणि मध्य रेल्वे भुसावळ प्रशासन या बिगर सिंचन पाणीवापर संस्थांसाठी 700 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणातून सोडलेले पाण्याचे आवर्तन मिळाल्याने आता शहरासाठी आगामी 30 ते 35 दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना कालबाह्य असल्याने 10 दिवसांआड पाणी मिळते. आवर्तनाला अजून काही दिवस विलंब झाला असता तरी शहराच्या पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती होती. मात्र हतनूर धरणातून दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, भुसावळ विभागीय रेल्वे व भुसावळ नगरपालिका या तिन्ही बिगर सिंचन पाणीवितरण संस्थांसाठी आवर्तन देण्यात आले आहे. यामुळे तुर्ततरी शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची चिन्हे आहेत.


बाष्पीभवनाचा वेग वाढणार
भुसावळ शहराचे कमाल तापमान गेल्या काळात 35 ते 40 अंशांच्या दरम्यान स्थिरावले होते. यामुळे या काळात 40 दिवस जलसाठा पुरला मात्र आता आगामी काळात तापमान 42 अंशांवर गेल्याने जलसाठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढेल. यानंतर शहराला दर 30 ते 35 दिवसांनी पाण्याची गरज भासणार आहे. तर एप्रिल व मे महिन्यात तापमान 45 अंशावर गेल्यानंतर बंधार्‍यातील हा साठा केवळ 25 दिवस टिकतो. यामुळे वेळेत आवर्तन मिळवणे गरजेचे राहिल.

नासाडी टाळली पाहिजे
शहरात पाणी वितरण यंत्रणेवरील पाईप लाईन व व्हॉल्व्ह गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. यामुळे आता पुढील काळात पाण्याची काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. शहरातील अनेक नळांना तोट्या नाहीत. यामुळे घरातील पाणी भरल्यानंतर पाण्याची नासाडी होते. पालिकेने जीर्ण व फुटलेल्या पाईपलाइन, नळांना तोट्या बसविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !