बोरखेडा सामूहिक हत्याकांड : खटल्याची 6 मे रोजी सुनावणी


भुसावळ (8 एप्रिल 2025) : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे 15 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री शेतात दोन मुली व दोन मुले अशा अल्पवयीन बालकांची हत्या झाली होती तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचारही करण्यात आला होता. या खटल्याची आता 6 मे रोजी सुनावणी होणार आहे.

6 रोजी पुन्हा नोंदवणार साक्ष
या खटल्यात 5 एप्रिलला विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे युक्तीवाद करणार होते परंतु विशेष सरकारी वकील यांनी सदर खटल्यातील शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी व डि.एन.ए. किट घेवून जाणारे मुद्देमाल वाहक पोलीस कॉन्स्टेबल अशा दोन साक्षीदारांना पुन्हा साक्ष घेणेकरीता रिकॉल ऑफ विटनेसचा अर्ज फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 311 नुसार दिला. विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एल.डी.गायकवाड यांच्यासमोर अर्ज मंजूर करण्याकरीता युक्तीवाद झाला.


त्यात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांचे न्यायनिवाडे दिले. या अर्जावर आरोपीचे वकील अ‍ॅड.सत्यनारायण रामफळ पाल यांनी तीव्र हरकत घेतली व सदरचा अर्ज नामंजूर होणेकरीता 15 मिनीट युक्तीवाद केला. त्यावर विशेष सरकारी वकील यांनी 25 मिनिट युक्तीवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्या.एल.डी.गायकवाड यांनी साक्षीदार पुन्हा साक्षीकरीता बोलविण्याचा विशेष सरकारी वकील यांचा अर्ज मंजूर केला. पुढील कामकाज 6 मे रोजी होणार असून त्या दिवशी वैद्यकीय अधिकारी व मुद्देमाल वाहक यांची पुन्हा साक्ष नोंदविली जाणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !