भडगाव तालुका हादरला : घराच्या वाटणीतील वादानंतर पित्याकडून मुलाची हत्या
Father kills son after dispute over house division भडगाव (9 एप्रिल 2025) : भडगाव तालुक्यात पित्यानेच मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्यामुळे हा प्रकार घडल असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द गावात 8 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाळू राजेंद्र शिंदे (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.
काय घडले नेमके ?
भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे शिंदे कुटुंब वास्तव्याला आहे. मंगळवार, 8 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मृत बाळू राजेंद्र शिंदे (26) याने घरच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्याच्या कारणावरून वाद उद्भवला. या रागातून वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (48) आणि भाऊ भारत शिंदे (22) यांनी बाळूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात लाकडी दांडक्याने चेहर्यावर आणि छातीवर जोरदार मारहाण केल्याने बाळूचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पाटील सुनील लोटन पाटील (54, बाळद खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात भारत शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के आणि पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करीत आहेत.


