धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : शेती साहित्याची चोरी करणार्यांना अट्टल आरोपींना शस्त्रासह बेड्या
नवे कोरे ट्रॅक्टर व साहित्य तसेच गावठी कट्टा व काडतूस जप्त

धुळे (9 एप्रिल 2025) : धुळे तालुक्यातील साक्री शिवारातील मलांजन येथील शेतातून शक्तीमान कंपनीचे रोटावेटर (शेतीचे अवजार) चोरट्यांनी लांबवले होते. याकरणी साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे दोन अट्टल चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरी केलेल्या साहित्यासह गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले. सुरेश उर्फ सुर्या रमेश गावीत (34, रा.सावरट, पोस्ट कोळदा ता.नवापूर, जि.नंदुरबार) व प्रभु होडया गावीत (31, रा.उचीशेवडी, ता.नवापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुन्ह्याची उकल : आरोपींकडून शस्त्र जप्त
मलांजन, ता.साक्री शिवारातून रोटावेटर चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना चोरट्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पेरेजपूर, ता.साक्री शिवारातून नाल्याजवळून संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देत 30 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल, एक हजार रुपये किंमतीचे काडतूस, पाच लाख रुपये किंमतीचे पासिंग नंबर नसलेले कोरे ट्रॅक्टर, एक लाख रुपये किंमतीचे रोटोव्हेटर, एक लाख रुपये किंमतीची बुलेट, 80 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण आठ लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सुरेश व प्रभू हे अट्टल असून त्यांच्याविरोधात साक्री, निजामपूर, पिंपळनेर, जायखेडा नाशिक ग्रामीण, विसरवाडभ पोलिसात दहा गुन्हे दाखल आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, अमित माळी, संजय पाटील, रामलाल अहिरे, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, तुषार सुर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, शिंदे, सुनील पाटील, अमोल जाधव, राजीव गिते, मयुर चौधरी, नारायण चव्हाण आदींच्या पथकाने केली.
