तहसीलदारपदावर मुलीला नोकरी लावण्याच्या आमिषाने जळगावातील महिलेला 18 लाखांचा गंडा


जळगाव (10 एप्रिल 2025) : मुलीला तहसीलदारपदाची नोकरी लावून देग्याचे आमिष दाखवत जळगावातील 53 वर्षीय महिलेला 18 लाख 81 हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी ज्योती अशोक साळुंखे (रा.मन्यारवाडा जळगाव) या महिलेविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगावातील नेहरू नगरात कल्पना आत्माराम कोळी (53) वास्तव्यास आहेत. कल्पना कोळी यांची ज्योती साळुंखे नावाच्या महिलेशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांना त्यांच्या मुलीला वैशाली कोळीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे प्रलोभन दाखवले. यावर विश्वास ठेवून कल्पना कोळी यांनी वेळोवेळी ज्योती साळुंखे यांना एकूण चार लाख 22 हजार रुपये रोख दिले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी झाल्यावर कल्पना कोळी यांनी आपल्या घरातील 110 ग्रॅम वजनाचे (सुमारे दहा लाखांचे) किंमतीचे सोन्याचे दागिनेही ज्योती साळुंखे यांच्या हवाली केले.

इतकेच नव्हे, तर ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांची मुलगी वैशाली कोळी यांनाही शासकीय योजनेच्या अर्ज भरण्याच्या कामात गुंतवले. एका अर्जामागे 100 रुपये मिळतील, असे सांगून वैशाली यांच्याकडून तब्बल 560 लोकांकडून अर्ज भरून घेतले आणि त्यापोटी जमा झालेले तीन लाख 51 हजार 950 रुपये स्वतः घेतले. अशा प्रकारे ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी आणि त्यांच्या मुलीकडून एकूण 10 लाख 73 हजार 950 रुपये उकळले.

माझी वरपर्यंत ओळख असल्याची धमकी
कालांतराने जेव्हा मुलीला नोकरी लागली नाही, तेव्हा कल्पना कोळी यांनी ज्योती साळुंखे यांच्याकडे विचारणा केली. मात्र, ज्योती साळुंखे यांनी पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला आणि कल्पना कोळी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. माझी वरपर्यंत पोहोच आहे, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला संपवायलाही कमी करणार नाही, अशा शब्दांत तिने कल्पना कोळी यांना धमकावले.

या सर्व प्रकारानंतर हताश झालेल्या कल्पना कोळी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्योती अशोक साळुंखे यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तावडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !