भरधाव पिकअप व दुचाकीत भीषण अपघात : जळगाव तालुक्यातील दोघे तरुण जागीच ठार
जळगाव (10 एप्रिल 2025) : भरधाव पिकअप वाहन व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जळगाव तालुक्यातील पाथरीतील दोघे तरुण ठार झाले. हा भीषण अपघात गुरुवार, दि. 10 एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला. भावेश गोरख पाटील (38) व महेंद्र उर्फ योगेश वसंत जाधव (38, दोन्ही रा.पाथरी, ता.जळगाव) अशी मृतांची नावे आहेत.
दुचाकीला जबर धडक
भावेश पाटील आणि महेंद्र जाधव हे गावातील संदीप शांताराम भील ( 35) यांच्यासोबत दुचाकीने पाथरी येथून जळगावी येत असताना वावडदा गावाजवळ समोरून येणार्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत भावेश पाटील हा जागीच ठार झाला तर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी भावेश पाटील, महेंद्र जाधव, संदीप भील यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून भावेश पाटील आणि महेंद्र उर्फ योगेश जाधव यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला होता. दुचाकी अपघातात संदीप भील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान भावेश पाटीलच्या पश्चात आई आहे व तो एका खाजगी लक्झरी बसवर चालक म्हणून काम करीत असल्याचे समजते.
महेंद्र जाधवच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. टेलर काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत असल्याचे सांगण्यात आले.


