नंदुरबार गुन्हे शाखेची कामगिरी : घरफोडीत बंदूक चोरणार्या अट्टल चोरट्यांना बेड्या
उपनगर हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल बंदुकीसह 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार (11 एप्रिल 2025) नंदुरबार तालुक्यातील घुली येथे चोरट्यांनी घरफोडी करताना 12 बोअरची बंदूक लांबवली होती. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत अट्टल घरफोड्यांना अटक करीत चोरी केलेल्या 12 बोअरच्या बंदुकीसह 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शरद ऊर्फ पवन अरुण चव्हाण (23, एकता नगर, नंदुरबार) व सनी विजय शिंदे (19, रा.एकता नगर, ह.मु.जयहिंद कॉलनी, नंदुरबार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दोन गुन्ह्यांची उकल
उपनगर हद्दीतील घुली येथे रोहिदास फकीरा पटले (मूळ रा.पळाशी) यांच्या बंद घरातून 12 बोअरची बंदूक चोरीला गेली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. संशयीत पवन चव्हाण व त्याचा मामे भाऊ सनी शिंदे यांना अटक केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देत बंदूक तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन काढून दिले. आरोपींच्या अटकेने उपनगर पोलीस ठाण्यातील गुरनं. 89/2025 तसेच गु.र.नं. 105/2025 असे दोन गुन्हे उघडकीस आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार मुकेश तावडे, विशाल नागरे, बापू बागुल, मोहन ढमढेरे, विकास कापूरे, शोएब शेख, अभय राजपुत, रामेश्वर चव्हाण, दीपक न्हावी आदींच्या पथकाने केली.