महिला ग्राम महसूल अधिकार्यांचा विनयभंग : भोरटेक पोलीस पाटील निलंबित
Bhortek Police Patil suspended for molesting female village revenue officer यावल (11 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील भोरटेक गावातील पोलीस पाटलाने तालुक्यातील एका 33 वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकार्याचा विनयभंग केला होता. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिला अधिकार्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत व त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम अन्वये प्रांताधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली.
महिला अधिकार्याचा पाठलाग करीत विनयभंग
भोरटेक, ता.यावल येथील पोलीस पाटील धनराज गोंडू कोळी यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात 33 वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत हा महिला अधिकार्याचा पाठलाग करणे, त्यांच्या कार्यालयात जावून शासकीय कामात अटकाव करणे आणि त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत असल्याने त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भोरटेक येथील पोलीस पाटील धनराज कोळी याने केलेला हा प्रकार अतिशय घृणास्पद असल्याने त्याच्याविरूध्द तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी निलंबनाचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात पाठवला होता. त्यानुसार प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी पोलीस पाटील यांना निलंबित केले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे.





