भुसावळ शहरातील दगडी पुलाजवळील नाल्यात आढळला अनोळखी प्रौढाचा मृतदेह
Body of unidentified adult found in drain near Dagdi Bridge in Bhusawal city भुसावळ (11 एप्रिल 2025) : शहरातील दगडी पुलाजवळील नाल्याच्या पाण्यात पडल्याने अनोळखी 40 ते 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. अनोळखी प्रौढाची अद्यापपर्यंत ओळख पटली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मयत हा भिकारी असल्याचा पोलीस यंत्रणेला संशय आहे.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील दगडी पुलाजवळ असलेल्या एका नाल्यात अनोळखी इसम मयत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी धाव घेतली. मयत वयोवृद्ध एक-दोन दिवसांपासून पाण्यात पडल्याने मयत झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत हा भिकारी असावा, असा अंदाज बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ यांनी वर्तवला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.





