शिरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी : चार पिस्टल व सात काडतूसांसह राजस्थानच्या संशयीताला बेड्या

Powerful performance by Shirpur city police : Suspect from Rajasthan arrested with four pistols and seven cartridges शिरपूर (14 एप्रिल 2025) : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राजस्थानच्या संशयीताला चार गावठी पिस्टल व सात जिवंत काडतूसासह अटक केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई रविवार, 13 रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. उमेदसिंग भवानसिंग राजपूत (24, मौकलसर, ता.शिवाणा, जि.बालोत्रा, राजस्थान) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गावठी कट्ट्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. रविवारी सायंकाळी सव्वा वाजेच्या सुमारास शिरपूर फाट्याजवळ 24 वर्षीय संशयीत पाठीला बॅग लावून येत असताना पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. झडतीत तरुणाच्या बॅगेत एक लाख रुपये चार पिस्टल व सात हजार रुपये किंमतीचे सात जिवंत काडतूस तसेच 13 हजार रुपये किंमतीचा मोबाईल सापडल्याने संशयीतास पोलीस ठाण्यात आणण्यात आले व कॉन्स्टेबल योगेश दाभाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, डी.बी.पथकातील हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, भटु साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, आरीफ तडवी, उमेश पवार, सचिन वाघ, सोमा ठाकरे चालक रवींद्र महाले, होमगार्ड मिथुन पवार व राम भील आदींच्या पथकाने केली.
