मंत्री गिरीश महाजन संतप्त : आमदार खडसेंसह पत्रकार थत्तेंंना अब्रु नुकसानीची नोटीस !

Minister Girish Mahajan angry: Notices for defamation against MLA Khadse and journalists! जळगाव (14 एप्रिल 2025) : मंत्री गिरीश महाजनांवर झालेल्या आरोपानंतर त्यांनी पत्रकार अनिल गगनभेदी थत्ते तसेच आमदार एकनाथराव खडसे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.
पत्रकार थत्ते यांनी व्हिडिओत महिला अधिकार्याशी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे रात्री-बेरात्री फोन करतात, असा गंभीर आरोप केल्यानंतर या आरोपाचा हवाला देत आमदार एकनाथराव खडसे यांनीदेखील मंत्री महाजनांवर टीका केली होती. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मंत्री महाजनांनी आमदार खडसेंसह पत्रकार थत्ते यांना कोर्टात खेचले आहे.

अब्रु नुकसानीची नोटीस बजावली
माझ्या वकिलाच्या माध्यमातून अनिल थत्ते आणि खडसे यांच्या विरोधात मी अब्रु नुकसानीची नोटीस बजावली आहे. कोणतेही सबळ पुरावे न देता एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांनी माझ्यावर टीका केली. जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्याचा हेतू यामागे होता. आता मी या दोघांशी कोर्टातच लढणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
अद्याप नोटीस मिळालेली नाही
मी गिरीश महाजनांविरोधात थेट आरोप केलेले नाहीत. पत्रकार अनिल थत्ते यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओचा हवाला तेवढा दिलेला आहे. एक पत्रकार राज्य सरकारमधील एका मंत्र्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचा हवाला देऊन, असे आरोप करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, एवढेच माझे म्हणणे होते. मला अद्याप कुठलीही नोटीस मिळालेली नाही, असे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले.
