जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन कक्षात राडा : त्रिकूट कायद्याच्या कचाट्यात
Ruckus in the emergency room of the District Government Medical College in Jalgaon : Triad in the grip of law जळगाव (18 एप्रिल 2025) : जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आपत्कालीन कक्षामध्ये तीन जणांनी येऊन एकमेकांना शिवीगाळ करत झोंबाझोंबी करून वाद केला. यावेळी परिसरातील शांततेचा भंग केल्याप्रकरणी बुधवार, 16 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके ?
जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या आपत्कालीन कक्षामध्ये सोमवार, 14 एप्रिल रोजी मध्यरात्री 1.30 वाजता उपचार घेत असताना संशय आरोपी राकेश प्रकाश पाटील (28, रा.आहुजा नगर), गौरव किशोर बागुल (28), गणेश शांताराम इंगळे (28, दोन्ही रा.आंबेडकर नगर) यांनी आपत्कालीन कक्षामध्ये येऊन सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना शिविगाळ केली.
पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. महाविद्यालयात शांततेचा भंग केल्याने सहाय्यक फौजदार संजय महाजन यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी राकेश प्रकाश पाटील, गौरव किशोर बागुल आणि गणेश शांताराम इंगळे या तिघांनी विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहेत.


