बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करा : भुसावळातील वकील वर्गाची मागणी

Impose President’s rule in Bengal : Demand of lawyers in Bhusawal भुसावळ (18 एप्रिल 2025) : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वक्फ बिलविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजावर कथित अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील काही ज्येष्ठ व कनिष्ठ वकीलांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या नावाने प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. वकीलांनी प्रांत कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुर्शिदाबाद येथे झालेल्या घटनेमुळे हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही कुटुंबांना स्थलांतर करावे लागले आहे.
राज्य शासन घटनात्मक यंत्रणा नीटपणे पार पाडण्यात अपयशी ठरत असून तेथे कायद्याचे राज्य धोक्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, वकीलांनी भारताच्या संविधानातील अनुच्छेद 356 नुसार पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करून राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तेथील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत ठेवून हिंदू समाजाचे संरक्षण करावे, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर अॅड.योगेश बाविसकर, अॅड.योगेश दलाल, अॅड.कीशेारसिंग राजपूत, अॅड.मनिषकुमार वर्मा याच्ंयासह 40 वकीलांच्या सह्या निवेदनावर आहे.