धुळे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : पावणेतीन लाखांचे साहित्यासह दोघे जाळ्यात
धुळे तालुक्यासह सोनगीर हद्दीतील चोर्यांची उकल : दोन पसार साथीदारांचा कसून शोध

Dhule Crime Branch’s big achievement : Two arrested with material worth three and a half lakhs धुळे (18 एप्रिल 2025) : धुळे तालुका पोलीस ठाण्यासह सोनगीर पोलीस ठाणे हद्दीतून डीजे साहित्याची चोरी करणार्या दोन चोरट्यांना धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख 80 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे तर आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरडाणे, ता.धुळे गावातून किरण कोळे यांच्या डीजे वाहनातून एक लाखांचे डीजे साहित्य 13 ते 14 दरम्यान चोरीस गेल्याने धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल होता. धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना या गुन्ह्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले. संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे (26, रामनगर, वडेल रोड, धुळे) व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी (24, साईबाबा मंदिराजवळ, नगावबारी, देवपूर धुळे) यांना अटक केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देत दोन लाख 80 हजारांचे साहित्य काढून दिले. चोरीत पसार साथीदार धनराज सुरसिंग भील व देविदास आनंदा पवार (दोन्ही रा.मोराणे, जि.धुळे) यांचा सहभाग असल्याचीही कबुली दिली. दरम्यान, आरोपी योगेश कोळी विरोधात धुळ्यातील देवपूर पोलिसात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, हवालदार संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, राहुल गिरी, महेंद्र सपकाळ, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.