रेल्वे झाली 173 वर्षाची : भुसावळात केक कापून व्यक्त केला आनंद
भुसावळ (19 एप्रिल 2025) : भारतीय रेल्वेचा पाया असलेल्या मध्य रेल्वेने आपला 172 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (सध्याचे सीएसएमटी) ते ठाणे दरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी धावली, आणि त्यानंतर रेल्वेने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू ठेवली. याच पार्श्वभुमीवर येथील डीआरएम कार्यालयात डीआरएम इती पांडे यांच्याहस्ते केक कापून अधिकार्यांनी रेल्वेचा वाढदिवस साजरा केला. 5 नोव्हेंबर 1951 रोजी विविध संस्थानांच्या रेल्वे सेवा एकत्र करून मध्य रेल्वेची स्थापना झाली.
सध्या मध्य रेल्वे महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये चार4 हजार 322.55 किमी मार्ग आणि 492 स्थानकांद्वारे सेवा देते आहे. मध्य रेल्वेने शताब्दी, जनशताब्दी, तेजस एक्सप्रेससारख्या गाड्यांमधून नाविन्य दाखवले. तसेच सध्या 10 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या कार्यरत आहेत. भारतातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे गाडी सेवा 1925 मध्ये सुरू करून, आज 100 टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. मुंबई उपनगरीय गाडीची सेवा तीन कोचपासून सुरू होऊन आज 15 कोचपर्यंत वाढली आहे. एसी लोकल सेवांमध्येही वाढ झाली असून सध्या एकूण 80 एसी फेर्या सुरू आहेत. अमृत भारत स्टेशन योजना, नवीन मार्ग, पूल, आणि स्थानकांचे आधुनिकीकरण मध्य रेल्वेत वेगात सुरू आहे.


नेरळ-माथेरान लाईट रेल्वेनेही 118 वर्षे पूर्ण केली आहेत. भुसावळ येथेही रेल्वेच्या 173 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल डीआरएम कार्यालयात डीआरएम ईति पांडे यांच्या हस्ते केक कापला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.





