भुसावळातील वाल्मीक नगरात दोन गटात दगडफेक : चौघांना अटक
गोळीबार झाल्याचा दावा निघाला बनावट : 14 संशयीतांविरोधात गुन्हा
Stone pelting in two groups in Valmik Nagar, Bhusawal: Four arrested भुसावळ (20 एप्रिल 2025) : शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगरात शुक्रवार, 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक होवून मारहाण झाली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
याप्रकरणी पोलिसांनी पुढाकार घेत स्वत: फिर्याद दिल्यावरून 14 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आला तर चौघांना अटक करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी गोळीबार झाल्याचा दावाही करण्यात आला होता मात्र तपासात हा प्रकार बनावट असल्याचेही निष्पन्न झाले.

दोन गट भिडले
शुक्रवारी रात्री 11.45 वाजता वाल्मीक नगरात दोन गटांमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यांनी मिळालेली माहितीची खात्री करण्यासाठी सहायक निरीक्षक अमितकुमार बागुल, हवालदार अमर आढाळे, जितेंद्र पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी यांना पाठवले. पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाल्यावर सुध्दा दोन वेगवेगळ्या गटांत सुमारे 20 ते 25 जण आपसात मारामारी करीत होते.
शनिवारी पोलिसांकडून संशयीतांचा कसून शोध
शुक्रवारी रात्री झालेल्या घटनेनंतर शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या सहकार्यांनी वाल्मीक नगर गाठत संशयीतांचा शोध सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्टलाच्या गोळीची रिंकामी पुंगळी जप्त केली. ही पुंगळी कोणत्या पिस्टलातील आहे, याचाही शोध पोलीस घेत आहे.




