अंदाज ठरला खरा : सोने पोहोचले लाखावर !
The prediction came true : Gold reached one lakh! नागपूर (21 एप्रिल 2025) : सोन्याला लग्नसराईमुळे मागणी वाढली असतानाच एप्रिलच्या अखेरीत सोने भावाने लाखाचा पल्ला गाठला आहे. सोन्याचे भाव आणखी गगनाला भिडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नागपूरात सोमवार, 21 रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव 97,200 रुपयांवर पोहोचले. सराफांकडे 3 टक्के जीएसटीसह लाख रुपयांवर विकले गेले. सोन्याचे भाव पुन्हा वाढतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 5,800 रुपयांची वाढ झाली. त्या तुलनेत चांदी प्रतिकिलो 3,800 रुपयांनी उतरली. शनिवारच्या 95,800 रुपयांच्या तुलनेत सोने 1,400 हजारांनी वाढून 97,200 रुपयांवर पोहोचले. तर चांदीही 1,300 हजारांनी वाढून 96,300 रुपयांच्या तुलनेत भाव 97,600 रुपयांवर पोहोचली.
ट्रम्प इफेक्टमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीचे दर कमी होतील आणि त्याचा फटका भारताला बसेल, असे तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज अखेर फोल ठरला. यावर्षी 1 जानेवारीला 76,900 रुपयांवर असलेल्या शुद्ध सोन्याचे भाव 21 एप्रिलपर्यंत 97,200 रुपयांपर्यंत वाढले. या दिवसात 20,300 रुपयांची वाढ अर्थात ग्राहकांना 20 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला.