बचत गटांचे पैसे लुटणारी धुळ्यातील टोळी जाळ्यात : धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

तीन पसार संशयीतांचा कसून शोध : दोन लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त


Dhule gang looting money from self-help groups caught : Dhule Local Crime Branch’s performance धुळे (22 एप्रिल 2025) : बचत गटांकडून कर्जाची रक्कम गोळा करून दुचाकीने कार्यालयाकडे निघालेल्या प्रतिनिधीला मारहाण करीत त्याच्याकडील एक लाख 65 हजारांची रोकड व दोन टॅब लांबवण्यात आले होते. ही घटना मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत 4 एप्रिल रोजी रात्री सव्वाआठ वाजता घडली होती. धुळे गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत स्थानिक दोघांना अटक करीत दोन लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

असे आहे लूट प्रकरण
आकाश छोटू कोळी (24, अजिंक्यतारा सोसायटी, धुळे) हे 4 रोजी रात्री सव्वाआठ वाजता बचत गटांचे पैसे घेवून भारत फायनान्स प्रा.लि.मारुती नगर, चाळीसगाव चौफुलीकडे निघाल्यानंतर त्यांना रस्त्यात अडवत आरोपींनी मारहाण करीत बचत गटाचे एक लाख 65 हजार व दोन टॅब हिसकावून पळ काढला होता. मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर समांतर तपासात धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना आरोपींची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. संशयीत बादल रमेश रामकोर (24, वरखेडी चौफुली, पाण्याच्या टाकीजवळ, धुळे), आनंद श्रावण सोनवणे (20, एकता नगर, पंकज हॉटेलमागे, अन्वर नाला, भिलाटी, धुळे) यांना अटक केल्यानंतर त्यांनी लूट केल्याची कबुली देत यात तीन पसार साथीदार रामदास उर्फ आप्पा छोटू पवार व अर्जुन बुधा मोरे (दोन्ही रा.मुंबई आग्रा हायवे रोड, पाण्याच्या टाकीजवळ, धुळे-मोराणे) व प्रवीण नारायण शिंदे (वरखेडी रोड, धुळे) यांनी मिळून केल्याची कबुली दिली.

दोन लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून एक लाख 35 हजार रुपये किंमतीची विना क्रमांकाची पल्सर दुचाकी, 50 हजार रुपये किंमतीची यामाहा दुचाकी (एम.एम.18 ए.जी.0044), पाच हजार रुपये किंमतीचा टॅब, 46 हजार 400 रुपये किंमतीचा अ‍ॅपल आयफोन मिळून दोन लाख 36 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजी मोरे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, दिनेश परदेशी, संतोष हिरे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, विनायक खैरनार, अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !