भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘मिशन संजीवनी’ : झेडपी सीईओ मीनल करनवाल

75 गावांमध्ये 296 ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग


ZP CEO Minal Karanwal जळगाव (22 एप्रिल 2025) :  जळगाव जिल्ह्यातील दिवसेंदिवस घटत चाललेली भूजल पातळी आणि त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती हे चित्र वर्षानुवर्षे कायम आहे. त्यावर मात करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने ‘मिशन संजीवनी’ हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केली आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील तब्बल 75 गावांमधील विविध ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या 296 कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

वाढते तापमान, पर्यावरणातील बदल आणि वाढते शहरीकरण यामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. आज असलेली पाणी टंचाईची तीव्रता भविष्यात उग्र स्वरूप धारण करू शकते. तसे घडू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी पुढाकार घेतला असून, शहरी भागातील नागरिकांनाही आपापल्या घरांच्या छतापासून ते जमिनीत खोलपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट बसवून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

‘मिशन संजीवनी’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत होणार्‍या सर्व प्रकारच्या नवीन इमारत बांधकामांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे) बंधनकारक करण्यात आले आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केल्याशिवाय संबंधित बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला आणि कंत्राटदाराचे देयक अदा केले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश श्रीमती करनवाल यांनी दिले आहेत.

‘मिशन संजीवनी’ अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील 75 गावांमधील 296 कामांना मान्यता मिळाली आहे आणि या सर्व ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रणाली स्थापित केली जाणार आहे. पावसाचे पाणी वाया न जाऊ देता ते थेट जमिनीत मुरवण्याचा एवढ्या मोठ्या स्तरावरील प्रयोग जळगाव जिल्ह्यात प्रथमच होत आहे. यामुळे निश्चितच जिल्ह्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर आणि यावल या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी पाच गावांमध्ये सुरू असलेल्या विविध इमारत बांधकामांच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केली जाणार आहे.

पाणी जमिनीत मुरवणे काळाची गरज
पाणी वाया जाऊ न देणे, पाणी वाचविणे हे सर्व ठिकच आहे, पण पाणी जमिनीत मुरविणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. ते करावेच लागेल. दुसरा पर्याय नाही, असे जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !