अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू
Father and daughter die on the spot after being hit by an unknown vehicle सोयगाव (23 एप्रिल 2025) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवार, 21 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जरंडी गावाजवळ सोयगाव-बनोटी रस्त्यावर घडला. धक्कादायक म्हणजे, या अपघातात दुचाकीस्वार पित्याला तब्बल पन्नास फूट फरफटत नेले. अपघाताची माहिती मिळताच निंबायती व जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
अजय रघुनाथ राठोड (32, रा.न्हावीतांडा), वैशाली अजय राठोड (8) असे मृत बाप-लेकीचे नाव आहे तर काजल अजय राठोड (वय.10) ही गंभीर जखमी झाली आहे. हे तिघेही जरंडी येथून निंबायती (न्हावीतांडा) येथे दुचाकी (क्र-एम एच-19 ए.बी.-3718) ने जात होते. सोयगाव-बनोटी रस्त्यावर जरंडी गावाजवळ मागून येणार्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना उडविले. या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निंबायती व जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवुन मदतकार्य केले. भरधाव अज्ञात वाहनधारकाने वाहनासह घटनास्थळवरून पळ काढला.