चोपडा तालुक्यात 18 लाखांचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त
कृषी विभागाच्या कारवाईने उडाली खळबळ : चुंचाळे-अक्कुलखेडा रस्त्यावर कारवाई
Fake HTBT cotton seeds worth Rs 18 lakh seized in Chopda taluka जळगाव (23 एप्रिल 20225) : 18 लाख रुपयांचे प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस बियाणे कृषी विभागाने गोपनीय माहितीद्वारे जप्त केले आहे. एका संशयिताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभागाने ही कारवाई केली.
विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, शमा तडवी यांचा पथकात समावेश होता. चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे-अक्कुलखेडा रस्त्यावरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला आणि त्यात एचटीबीटी कापूस बियाण्याचे 1273 पाकिटे (किंमत 17 लाख 82 हजार 200 रुपये) जप्त करण्यात आली.
बियाणे कायदा, बियाणे नियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत ही कारवाई झाली. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहेत.