नवापूर पोलिस ठाण्यातील फौजदार अपघातात ठार

A police officer from Navapur police station died in an accident नवापूर (25 एप्रिल 2025) : नवापूर पोलिस ठाण्यातील फौजदाराचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. जगदीश बाबूलाल सोनवणे ( 57) असे मृत अधिकारचे नाव आहे.
पोलिस उपनिरीक्षक सोनवणे (रा. समर्थविहीर, कोकणीहिल नंदुरबार) हे रात्री नवापूरकडून नंदुरबारकडे येत असताना कळवान गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांना तत्काळ उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

धडक एवढी जोरदार होती की मोटारसायकलपासून सोनवणे 15 ते 20 फूट अंतरावर फेकले गेले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साबळे तसेच पोलिस अधिकारी व अंमलदार हे रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात थांबून होते.
मृत सोनवणे हे विसरवाडी पोलिस ठाण्यात पाच वर्षे कार्यरत होते. पोलिस खात्यातून सेवानिवृत्त होण्यासाठी त्यांना केवळ सहा महिनेच बाकी असतानाच त्यांचे अपघाती निधन झाल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
