आयपीएस झालं धनगराचं लेकरू अन् आसमंतातून निनाद झाला, येळकोट येळकोट जय मल्हार !

25 रुपये रोजाने राबायला जाणारी आई झाली आकाशाहून मोठी ;


IPS became the son of Dhangar; Happy sheep and happy lamb! न्युज डेस्क । कोल्हापूर (27 एप्रिल 2025) : खांद्यावर कांबळ टाकून मेंढ्यांच्या कळपामागे रानोमाळ भटकणे त्याच्या वाट्याला पिढीजात आलेले. शेतात मेंढ्या बसवणे, लोकर कमावणे हे सारे करत असताना तो शिक्षणही कमवत होता. ज्ञान जमवत होता. दहावीला थोडे-थोडके नव्हे तर तब्बल 96 टक्के गुण त्याने कमवले. हे दिव्य करणारा डोणे कुळातला तो पहिलाच मुलगा होता. त्याचा सत्कारही झाला. सत्काराला उत्तर देताना तो बोलून गेला, मी आयपीएस होणार त्याला तब्बल आठ-नऊ वर्षे उलटलेली होती आणि या क्षणालाही तो मेंढरंच हाकत होता एक उनाड कोकरू सारखं बाजूला पडत होतं अर्रर्रर्र असा काहीसा आवाज काढून बिरदेव (Birdev Donne) त्याला पुन्हा कळपात घुसडत होते आणि अचानक एक फोन आला बिरदेव भावा तू आयपीएस क्रॅक केलीस.

या क्षणाला बिरदेव यांनी आकाशाकडे पाहिले. ते सारे आनंदाने भरून आलेले होते. मेंढरांवर नजर गेली तीही जणू आनंदलेली होती. उनाड कोकरू बिरदेव यांनी उचलून हृदयाशी लावले. ते तर आनंदलेले होतेच. पक्ष्यांचा आरवही मल्हार झालेला होता बिरदेव यांच्या तोंडूनही उत्स्फूर्तपणे निघाले जय मल्हार !!!




कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील यमगे हे बिरदेव डोणेचे गाव. यूपीएससी परीक्षेत त्याने 551 वा रँक मिळवला आहे. निकाल कळताच बिरदेवचा पहिला सत्कार पालावरच त्याच्या मामांनी फेटा बांधून केला. बिरदेवच्या घरगुती सत्काराचा हा व्हीडिओ व्हायरल झाला आणि प्रचंड कष्टातून पुढे येणार्‍या संघर्षशील तरुणाईचे तो प्रतीक बनला.

बिरदेवने (Birdev Donne)  बालपणापासून पडेल ती कामे केली. ट्रॅक्टर ट्रॉलीत खडी भरण्यापासून ते आणखी असे बरेच काही. बिरदेवला कळू लागले तेव्हा त्याची आई दुसर्‍याच्या शेतामध्ये 25 रुपये रोजाने मजुरी करत असे. इतके कष्ट उपसल्यानंतर किती कमी पैसे मिळतात, हा प्रश्न बिरदेवच्या बालमनाला पडे. अभ्यासात लक्ष घातले तर आपण हे चित्र पालटू शकतो, हे त्याने मनावर घेतले.

दहावीतील अद्भूत यशानंतर, मी आयपीएस होणार, असे बिरदेव (Birdev Donne)  बोलून गेले खरे, पण दहावीनंतर त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर इंजिनिअरिंग आणि मग पुढे यूपीएससीची तयारी सुरू केली. यादरम्यान काय घडले हे बिरदेव यांच्याच शब्दांत सांगायचे तर, चांगले मित्र मला मिळाले व मी कुठल्याही व्यसनाला होकार दिला नाही. मित्रांनी प्रसंगी पैशाअडक्याचीही मदत केली. वडील थोडेफार शाळा शिकलेले, पण यूपीएससी काय असते, त्याचा गंध त्यांनाही नव्हता. मीही लहानपणी एक मोठा हुद्दा म्हणून आयपीएस होणार हे बोलून गेलेलो होतो, पण मला मिळालेले मित्र हेच याबाबतीतही माझे कल्चरल कॅपिटल ठरले. मित्रांनीच मला यूपीएससीसाठी उद्युक्त केले. त्यासाठीचे सारे मार्गतर दाखवलेच, पण या मार्गावर चालताना मी अडखळू नये म्हणून हे मित्र मला सतत आधार देत गेले.

बिरदेव (Birdev Donne)  यांनी 2019 पासून यूपीएससी परिक्षेचा सिरियसली अभ्यास सुरू केला. त्यासाठी त्यांनी एक वर्ष दिल्लीत आणि काही वर्षे पुण्यात काढली. अखेर तिसर्‍या प्रयत्नात हे यश मिळाले. बिरदेव यांचे वडील, भाऊ, बहीण सार्‍यांनाच आकाश ठेंगणे झालेले आहे. आई तर बिरदेव यांच्या यशाने आकाशाहून उंच झालेली आहे. बिरदेव आयपीएस झालेत म्हणजे नेमकेपणाने काय घडलेले आहे, यातले या माऊलीला काही कळत नाही. तिला फक्त एवढे कळते आहे, की माझा लेक कुणीतरी फार मोठा साहेब झालेला आहे.

आणि आत्मविश्वास आला!
पुण्यातील सीओईपीमध्ये (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) शिकत असताना एके वर्षी आमच्या सिव्हील सर्व्हीसेस क्लबमधले 15 जणांची निवड झाली. निवड झालेले बहुतांश माझ्यासारखीच कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले होते. त्यातील अनेक जण इंग्रजीतही माझ्याप्रमाणेच फाडफाड नव्हते. अरे हे होऊ शकतात तर मी का नाही, असा आत्मविश्वास माझ्यात आला. मग 2019-20 मध्ये मी एनसीआरटी वाचायला सुरु केले. इंग्रजीवर काम केले. आता फूल टाईम यूपीएससी, हे ठरवून टाकले. तयारीला दररोज सहा ते आठ तास दिले. क्लासच्या फीसाठी मित्रांकडून, आप्तांकडून मदत झाली, असे बिरदेव सांगतात.

‘मी पीडा ऐकणारे कान होईन’
यूपीएससी, निकाल या सगळ्या गडबडीत माझा मोबाईल फोन कुणीतरी माझ्या हातातून हिसकून नेला. मी पोलिसात तक्रार द्यायला गेलो, तर माझे कुणी साधे एकूनही घेतले नाही, अशी कैफियत बिरदेव मांडतात. पीडित माणसाची पहिली अपेक्षा काय असते, की त्याची पीडा दोन कानांनी ऐकावी. आयपीएस म्हणून कर्तव्य बजावताना मी किमान ते कान होईन, असेही बिरदेव सांगतात. सध्या कुणी ऐकूनच घेत नाही. म्हणून समाजात फ्रस्ट्रेशन आहे. मी ऐकेन, प्रतिसाद देईन, देवाने मला इतकी ताकद अन् बळ द्यावे, की मी त्याची पीडाही दूर करू शकेन, तसे मी जर केले तरच आज माझ्या आईला मी मोठा साहेब झाल्याचा जसा आनंद होत आहे, तसा मी आयपीएस झाल्याचा मलाही होईल !







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !