जळगावात पिस्टलाची विक्री करताना दोघे जाळ्यात

Two arrested while selling pistol in Jalgaon जळगाव (28 एप्रिल 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी पिस्टलाची खरेदी-विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडत त्यांच्याकडून पिस्टल जप्त केले. ही कारवाई शहरातील शिरसोली रोडवरील मेहरूण तलावाजवळ शनिवारी दुपारी 4.30 वाजता करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या शिरसोली रोडवरील मेहरूण तलावाजवळ काही तरुण हे बेकायदेशीरपणे गावठी पिस्टलासह जिवंत काडतुसाची खरेदी- विक्रीसाठी येणार असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजता कारवाई केली.

यावेळी पोलिसांनी संशयित आरोपी मुदस्सीर नझर सलीम परवेझ शेख उर्फ साहील मुद्दा (24, रा.तांबापुरा) व नदीम खान साबीर खान उर्फ गोल्डन (रा.चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गावठी पिस्टल तसेच पाच जिवंत काडतूस आणि मोटारसायकल असा एकूण दोन लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हवालदार हरीलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहे.