पारोळा पोलिसांनी अपघाताचा बनाव उधळला : एक कोटींच्या विम्यासाठी शालकाला संपवले : मेहुण्यासह मित्राला बेड्या

पारोळा हद्दीतील घटना : मृताच्या नावावर कोट्यवधींचा विमा असल्याने डोक्यात रॉड मारून संपवले


 insurance of Rs 1 crore: Brother-in-law and friend in chains पारोळा (29 एप्रिल 2025) : शालकाच्या नावावर असलेल्या कोट्यवधींची विमा पॉलिसी पाहून मेहुण्याची नियत बदलली व मित्राच्या मदतीने त्याने शालकाचाच डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला. खुनाला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी शालकाचा मृतदेह पारोळा पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीसह फेकून देण्यात आला. सुमारे 15 दिवसांपूर्वी दाखल असलल्ेया अपघाताच्या नोंदीनंतर पारोळा पोलिसांनी सुक्ष्मरितीने केलेल्या तपासात हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मेहुण्यासह त्याच्या साथीदार मित्राला पारोळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. समाधान शिवाजी पाटील (26, फागणे, जि.धुळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आधी केला अपघाताचा बनाव
पारोळा पोलीस ठाणे हद्दीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समाधान शिवाजी पाटील (26, फागणे, जि.धुळे) हा तरुण शुक्रवार, 18 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास बेशुद्ध स्थितीत आढळल्याने त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले मात्र धुळे येथे हलवण्याचा सल्ला दिल्यानंतर धुळ्यात डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. धुळे पोलिसात संदीप भालचंद्र पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर ती पारोळा पोलिसात वर्ग करण्यात आली.

स्कूटीच्या अपघाताचा बनाव उघड
पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आल्यानंतर तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे यांनी आपले कसब पणाला लावले. अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेहापासून अपघातग्रस्त दुचाकीचे असलेले अंतर व पडलेले रक्ताचे डाग तपासण्यात आले मात्र स्कूटी (एम.एच.54 ए.9513) ला अपघातात काडीमात्र नुकसान झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे संशय बळावला. तपासाधिकार्‍यांनी मृताची माहिती काढल्यानंतर मयत समाधान पाटील हा तरुण कापूस व्यापारी असलेला मेहुणा संदीप भालचंद्र पाटील (शेवगे बुद्रुक, ता.पारोळा, जि.जळगाव) यांच्याकडे वास्तव्यास असल्याचे कळाले व तो अपंग असल्याने वाहन चालवू शकत नसल्याची माहिती नातेवाईकांकडून कळाल्यानंतर संशयाची पाल चूकचुकली.

मृताच्या नावावर एक कोटींहून अधिक रकमेच्या पॉलिसी
मृत समाधान पाटील याच्या नावावर गेल्या काही वर्षात मॅक्सलाईफ, एसबीआय लाईफ, एलआयसी आदींसह विविध कंपन्यांच्या पॉलिसी काढण्यात आल्याचे व त्याचा प्रिमीयम त्याचा मेहुणा संदीप पाटील हाच भरत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर मेहुण्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले मात्र त्याने ‘मी नाही त्यातला’ म्हणत कानावर हात ठेवले. पोलिसांच्या तपासात संशयीत मृत व अन्य एकासह स्कूटीवरून जाताना दिसल्यानंतर पोलिसांनी मेहुण्याला पोलीस ठाण्यात आणत बोलते केल्यानंतर त्याने मित्र चंद्रदीप आधार पाटील (खवशी, ता.अमळनेर) सोबत शालकाला एक कोटीहून अधिक रकमेच्या पॉलिसीसाठी संपवल्याची कबुली दिली.

मेहुण्यानेच दारू पाजून शालकालाच संपवले
मेहुणा संदीप भालचंद्र पाटील (शेवगे बुद्रुक, ता.पारोळा, जि.जळगाव) याने काही वर्षांपूर्वीच शालकाच्या मृत्यूनंतर पॉलिसीची रक्कम मिळेल या आमिषाने त्याच्या अनेक पॉलीसी काढल्या व त्याचा प्रिमीयम स्वतःच भरला. घटनेच्या दिवशी आरोपी मेहुणा हा दिवसभरात अमळनेरात थांबला. त्याने मदतीसाठी मित्र चंद्रदीप पाटील यास बोलावून घेत शालकाला यथेच्छ मद्यपान करायला दिले व त्यात गुंगीकारक औषध टाकले. शालक बेशुद्ध होताच त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यास पारोळा हद्दीत टाकले व तत्पूर्वी अपघाताचा बनाव दाखवण्यासाठी वापरलेल्या स्कूटीवरून मित्राला बसस्थानकावर सोडले व नंतर स्कूटी शालकाच्या मृतदेहाजवळ टाकून दिली.

पारोळा पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल
तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे यांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपी संदीप भालचंद्र पाटील (शेवगे बुद्रुक, ता.पारोळा, जि.जळगाव) याने व त्याचा साथीदार चंद्रदीप आधार पाटील (खवशी, ता.अमळनेर) यांना रविवारी रात्री अटक केली. न्यायालयात त्यांना हजर केले असता 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुमारे एक कोटीहून अधिक विम्याची रक्कम हडप करण्यासाठी डाव मात्र सतर्क पोलिसांमुळे उधळला गेल्याने तपासाधिकारी वसावे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे, हवालदार सुनील हटकर, संजय पाटील, अनिल राठोड, अभिजीत पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !