जळगावात पूर्व वैमनस्यातून गोळीबार : सहा जणांच्या टोळीला रामानंद पोलिसांच्या बेड्या
Firing due to former enmity in Jalgaon: Ramanand police handcuffs a gang of six people जळगाव (30 एप्रिल 2025) : शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.
वाढदिवसाच्या कार्यक्रमात झाला गोळीबार
महेंद्र समाधान सपकाळे (20, रा.पिंप्राळा) हा मित्र भूषण अहिरेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये आल्यानंतर संशयीत व तक्रारदारात असलेल्या जुन्या वादातून आरोपींनी महेंद्रवर गोळीबार केला व गोळी सपकाळे यांच्या कमरेखाली लागल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेकडून सहा आरोपींना बेड्या
गुन्हे शाखेने तपासादरम्यान मुख्य संशयीत विशाल भिका कोळी यास पिस्टलासह पकडले तर अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धीरज उर्फ वैभव उर्फ गोलु कोळी, सागर अरुण भोई उर्फ जाड्या भोल्या, नितेश मिलिंद जाधव आणि गिरिष किशोर घुगे यांनाही अटक केली. आरोपी गिरीष घुगे याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले तर घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस आणि दोन काडतुसांच्या पुंगळ्या तसेच कोयतादेखील पोलिसांनी जप्त केला.
संशयीतांविरोधात गंभीर गुन्हे
मुख्य आरोपी विशाल कोळी याच्याविरोधात जळगाव शहर आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी अक्षय धोबी याच्याविरोधात आठ गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नितेश जाधव याच्याविरुद्ध 15 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी संशयीतांविरोधात प्रतिबंधात्मक कारवायादेखील करण्यात आल्या आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय संदीप वाघ, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, एएसआय संजय सपकाळे, हवालदार जितेंद्र राजपूत, हवालदार जितेंद्र राठोड, हवालदार सुशील चौधरी, हवालदार ईरफान मलिक, नाईक मनोज सुरवाडे, नाईक रेवानंद साळुंखे, नाईक हेमंत कळसकर, नाईक विनोद सूर्यवंशी, कॉन्स्टेबल उमेश पवार, कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण सुरवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.