भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनीत दोन लाखांची घरफोडी
Burglary of two lakhs in Muslim colony of Bhusawal city भुसावळ (30 एप्रिल 2025) : शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरातील घरातून चोरट्यांनी भिंतीवरून उडी मारत घरात प्रवेश करीत एक लाख 97 हजारांचा ऐवज लांबवला. गजबजलेल्या भागात झालेल्या धाडसी घरफोडीनंतर मुस्लीम कॉलनी परिसरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ बाजारनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी एक लाखांच्या रोकडसह तब्बल 46 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवले आहे. सोन्याचे आजचे मूल्य सुमारे चार लाखांवर असलीतरी पोलिसांनी मात्र जुन्या किंमतीत घेतलेल्या सोन्याचे दर लावले आहे.
मुस्लीम कॉलनीत खळबळ
शेख मो.दानिश शेख हुसेन (32, मुस्लीम कॉलनी, बहारे मशिदीजवळ, बरकत किराणा, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी घराच्या वॉशिंग मशीन ठेवलेल्या जागेवरील भिंतीवरून उडी घेतली व जिन्याने खाली येत किचनमधील उघड्या कपाटातून एक लाख 97 हजारांचा ऐवज लांबवला.

फॉरेन्सिक तज्ज्ञ दाखल
चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड, 20 ग्रॅम वजनाची व 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, पाच ग्रॅम वजनाची व दहा हजार रुपये किंमतीची अंगठी, 10 ग्रॅम वजनाची व 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, सहा ग्रॅम वजनाचे व 12 हजार रुपये किंमतीचे कानातले, पाच ग्रॅम वजनाची व दहा हजार रुपये किंमतीची अंगठी, एक हजार रुपये किंमतीची पांचाली, चार हजार रुपये किंमतीची चैनपट्टी मिळून एक लाख 97 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच जळगाव येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी ठसे टिपण्याचा प्रयत्न केला.




