भुसावळात दोन गावठी पिस्टलासह सात जिवंत काडतूस जप्त
शहर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : शहर पोलीस ठाण्याजवळच कारवाई
Two village pistols and seven live cartridges seized in Bhusawal भुसावळ (4 मे 2025) : शहर हद्दीतील तार ऑफिस रोडवरील एका हॉटेलमध्ये दोघा संशयीतांकडून शहर पोलिसांनी दोन पिस्टल व सात जिवंत काडतूस जप्त केले, ही कारवाई शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री 8.30 वाजता गुप्त माहिती मिळाली की, तार ऑफिस रोडवर एका हॉटेलच्या बाहेर एक संशयीत उभा आहे. त्याच्याजवळ पिस्तूल आहे, याची खात्री करण्याच्या सूचना निरीक्षक डमाळे यांनी पोलिस कर्मचार्यांना दिल्यावर पोलिसांचे पथक मिळालेल्या माहितीवर खात्री करण्यासाठी गेले असता, तेथे रितीक उर्फ गोलू निंदाने (रा. वाल्मीक नगर, भुसावळ ) हा उभा होता, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली, त्यामुळे त्यांची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने मित्र भेटायला येत असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी परिसरात सापळा लावून थांबले असता तेथे सुमीत सोलसे (25, रा.न्यू.आंबेडकर नगर, भुसावळ) हा आला पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असता, त्याच्या कंबरेला सुध्दा एक गावठीी पिस्तूल व 3 काडतुसे मिळाली. यामुळे पोलिसांनी दोन्ही जणांना अटक केली.

दोन, पिस्तूल व 7 काडतुसे पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी एक लाख दोन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कर्मचारी कुणाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोन्ही संशयीतांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशयीतांनी पिस्तूल कोठून आणले, ते काय करणार होते, दोन्ही जण कोठे जात होते का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे, असे निरीक्षक डमाळे यांनी सांगितले.




