भुसावळात आठवणीतील माहेर कार्यक्रमात ‘स्त्री सखींची धमाल’

प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन : विजेत्यांना मिळाले आकर्षक बक्षीस


The program was organized by Pratishtha Mahila Mandal : The winners received attractive prizes भुसावळ (5 मे 2025) : स्त्रीच्या आयुष्यातील खरे खुरे नंदनवन म्हणजे तिचे माहेर व याच माहेरी अक्षयतृतीयेला सासरवाशीन येवून घरच्यांसोबत रमते, झोके खेळते, आंब्याचा रस, पुरणाची पोळी, कुरडई-पापड यांचा मनसोक्त आस्वाद घेते मात्र आधूनिक युगातील बदलत्या जीवनशैलीत हे चित्र जवळपास दुरापास्त ठरू पाहत आहे. भुसावळातील उपक्रमशील प्रतिष्ठा महिला मंडळाने या जुन्या आठवणी पुन्हा ‘आठवणीतले माहेर’ या कार्यक्रमातून ताज्या केल्या. शहरासह तालुक्यातील एक हजारांवर महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्यातील कलागुण सादर करीत उपस्थितांनाही थक्क केले. यावेळी लकी ड्रॉ विजेत्या सखींना आकर्षक पैठणी देण्यात आली.

बैलगाडीतून महिलांचे स्वागत : विविध स्पर्धांनी जिंकली मने
शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉनमध्ये रविवार, 4 मे रोजी आयोजित ‘आठवणीतील माहेर’ कार्यक्रमात दहा सजवलेल्या बैलगाडीतून महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. सर्व महिलांसाठी आंब्याचा रस, पुरणाची पोळी, आमटी, कुरडई, पापड यांचे जेवण देण्यात आले शिवाय सर्व सवाष्ण महिलांना हळदी-कुंकू देवून ओटी भरण्यात आली.

स्पर्धेतून कलागुणांची झलक
महिलांसाठी यावेळी सर्वोत्तम भारतीय नववधू (बेस्ट इंडिअन ब्राईडल), समूह नृत्य स्पर्धा (ग्रुप डान्स स्पर्धा), वेशभूषा स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच सुप्त कलागुणांच्या सादरीकरणासाठी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली.

सासुरवाशीनीला जिव्हाळा म्हणजे माहेर : रजनी सावकारे
सासरी आलेल्या स्त्रीसाठी तिचे माहेर म्हणजे नंदनवनच ! दिवसभराच्या रहाटगाड्यात स्त्रीला स्वतःकडेच पहायला वेळ नाही, उपजत कलागुण असूनही सादरीकरणासाठी व्यासपीठ नाही व माहेरची ओढ असलीतरी कौटूंंबिक जवाबदार्‍यांच्या ओझ्यामुळे प्रत्येकवेळी जाणे शक्य नाही म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ‘आठवणीतले माहेर’ हा उपक्रम राबवण्यात येतो. महिलांसाठी दिवसभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या व एका दिवसांसाठी का असेना महिला त्यांच्या भावविश्वात रमल्याचे व कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे समाधान असल्याचे मनोगतात प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी सांगितले.

मान्यवरांनी दिल्या कार्यक्रमास शुभेच्छा
या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, डॉ.केतकी पाटील, डॉ.संगीता बियाणी, कृउबा सभापती वारके यांच्यासह पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, शहरातील माजी नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वच मान्यवरांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन राजश्री देशमुख व प्रास्ताविक प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !