इन्स्टाग्रामवरून जुळले प्रेम : दोघांच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध होताच चिमुकल्यासह तिघांची पाचोरा तालुक्यात रेल्वेखाली आत्महत्या
Love found through Instagram : Three people, including a child, commit suicide under a train in Pachora taluka after opposition to their extramarital affair पाचोरा (7 मे 2025) : तो आणि ती दोघेही विवाहित मात्र सोशल मिडीयातील इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली अन् ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. त्याच्यासाठी ती ‘पती’ला सोडून चिमुकल्या मुलाला घेवून त्याच्या गावी आली. सोबत काही दिवस घालवल्यानंतर कुटूंबियांचा विरोध पाहता त्यांनी गाव सोडत अयोध्या सुपरफास्ट एक्स्प्रेसखाली झोकून देत आत्महत्या केली. चित्रपटाच्या कथानकाला साजेशी ही घटना पाचोरा तालुक्यातील पाचोरा-परधाडे रेल्वे मार्गावर घडली. मंगळवारी सायंकाळपर्यंत तिघांची ओळख पटवण्यात यंत्रणेला यश आले.
राजेंद्र निंबा मोरे (22, रा.भातखंडे खुर्द, ता.पाचोरा), राधिका ठाकरे (25) व सारंग ठाकरे (4, दोन्ही रा.बारामती) अशी मृतांची नावे आहेत. पाचोरा ते परधाडे दरम्यान रेल्वे किलोमीटर खांब क्रमांक 376/19 जवळ सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
असे जुळले दोघांचे प्रेम
चार वर्षांपूर्वीच राजेंद्र निंबा मोरे (भातखंडे खुर्द, ता.पाचोरा) याचा विवाह झाला व त्यास पत्नी व मुलगी आहे. इंस्टाग्रामवरूने राजेंद्रची राधिका ऊर्फ सोनी लहू ठाकरेशी ओळख होवून प्रेम जुळले. राधिका ऊर्फ सोनी हिस पती व तीन मुले असून त्यांची भेट मागील महिन्यात सप्तशृंगी गडावरील यात्रेच्या निमित्ताने झाल्यावर त्याने राधिकाला मुलगा सारंगसह भातखंडे खुर्द गावी आणले. राजेंद्रच्या आई-वडिलांना ही बाब मान्य नसल्याने त्यास घरात प्रवेश दिला नाही. प्रेमीयुगुल गेल्या महिनाभरापासून भटकत होते. अखेर त्यांनी 5 रोजी रात्री आठच्या सुमारास सोबत असलेली कपड्यांची पिशवी एका झाडाखाली ठेवून धावत्या रेल्वेखाली बालकासह आत्महत्या केली.
लोकोपायलटच्या माहितीनंतर प्रकार उघडकीस
अयोध्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तरांना पाचोरा ते परधाडे दरम्यान रेल्वे किलोमीटर खांब क्रमांक 376/19 जवळ एक महिला, पुरुष आणि लहान मुलगा रेल्वे पटरीवरून चालत येत असताना धावत्या गाडीसमोर आल्याचा प्रकार कळवला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, हवालदार राहुल शिंपी, मनोहर पाटील, अशोक हटकर, समाधान भोसले यांनी रुग्णवाहिकासह घटनास्थळी धाव घेतली.
छिन्नविछिन्न अवस्थेतील तिघांचे मृतदेह पोलिसांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. रात्री मृत तरुण हा राजेंद्र मोरे असून तो भातखंडे येथील असल्याची ओळख पोलिसांनी पटविली व मंगळवारी पोलिसांनी उर्वरित दोघा मयतांची ओळख पटविण्याच्या तपासाला गती दिल्यानंतर सायंकाळी महिला आणि बालकाची ओळख पटली.
महिला बारामती जिल्ह्यातील असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्याबरोबरच तिघांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. बारामती पोलिसांशी पाचोरा पोलिसांनी संपर्क साधून मृत महिलेबद्दल माहिती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.