भुसावळात वादळी वार्यामुळे उडाली दाणादाण : पोल कोसळले, वृक्ष उन्मळले
Heavy rains caused hailstones to fall in Bhusawal : Poles fell, trees uprooted भुसावळ (7 मे 2025) : शहरात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान वादळी वार्यासह पाच मिनिट पावसाने हजेरी लावली. यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान तब्बल 10 मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वादळी वार्यांमुळे संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला. वादळी वार्यांमुळे तब्बल 27 वीज पोल कोसळले तर तब्बल 80 ठिकाणी वीजतारा तुटल्या. खेडी सबस्टेशनवरुन शहराला वीजपुरवठा करणार्या 33 केव्हीच्या दोन वाहिन्या तुटल्या. सायंकाळी त्या सुरु झाल्या, मात्र अंतर्गत भागातील सर्वच 11 केव्हीच्या वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या कोसळल्याने रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडीत होता.
रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत
मंगळवारी दुपारी अडीच वाजेपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. तर तीन वाजेच्या दरम्यान वादळी वार्यासह पाच मिनिट पाऊस झाला. मात्र पाच मिनिटांच्या वादळी पावसाने शहरात दाणदाण उडवली. शहरात तब्बल 8 ठिकाणी झाडे कोसळली. महावितरणचे सर्वाधिक नुकसान झाले. शहरातील तीन पैकी दोन 33 केव्ही वाहिन्या बंद झडाल्या. यावर दुरुस्ती करण्यात आली. मात्र शहरात तब्बल 27 ठिकाणी वीजपोल कोसळले. तर तब्बल 80 ठिकाणी वीजतारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने तारा तुटल्या. महावितरणचे शहर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनोज अनसीनकर यांनी विविध भागांना भेटी देवून तातडीने दुरुस्ती कार्य पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. दुरुस्ती कार्य सुरु झाल्यानंतर सायंकाळी सवा वाजेच्या दरम्यान पून्हा 15 मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे दुरुस्तीसाठी अडथळे निर्माण झाले. यामुळे संपूर्ण शहरात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडीत होता.


झाडे उन्मळून पडली
वादळी वार्यामुळे हरातील रेल्वे भागातील विश्रामगृहाचे पत्रे उडाली. हनुमान नगर परिसरात झाडे उन्मळून पडली. तर दत्तनगर परिसरातील विवाह कार्यालयातील मंडप उडाला. अचानक झालेल्या पावसामुळे शहरात दाणादाण उडाली.
काही भागात गारांचा वर्षाव
शहरात दुपारी तीन वाजता पाच मिनिटांत 1.8 मिली पाऊस झाला. तर सायंकाळी सहा वाजता सरासरी 10 मिनिटांत 4 मिली पाऊस झाला. तर जामनेररोड, आनंद नगर आदींसह काही भागांमध्ये बोरापेक्षा लहान आकाराच्या गारांचा वर्षाव झाल्याचेही नागरिकांनी सांगितले.
पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प
शहरातील जलशुध्दीकरण केंद्र व रॉ वॉटर पंपिंग हाऊसचा या एक्स्प्रेस फिडरचाही वीजपुरवठा दुपारी तीन वाजेपासून खंडीत झाला. तो रात्री उशिरापर्यंतही कार्यरत न झाल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली. यामुळे शहरातील रोटेशनवरही परिणाम होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी यांनी दिली.





