जळगावसह 14 जिल्ह्यांवर आता अवकाळी पावसाचे संकट


14 districts including Jalgaon are now facing the threat of unseasonal rains जळगाव (9 मे 2025) : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे कंबरडे मोडल्यानंतर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट जिल्ह्यावर असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. केवळ जळगावच नव्हे तर 14 जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी चार दिवस नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यांसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने जळगावसह 14 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, जळगाव जिल्ह्यात 6 आणि 7 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे 7 हजार 235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव व चोपडा तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकर्‍यांना धीर देत त्यांनी स्पष्ट केले की, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. या पाहणी दौर्‍यात पालकमंत्र्यांसोबत आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !