जळगाव जिल्ह्यात दोन दुचाकींचा भीषण अपघात : दोघे दुचाकीस्वार ठार

Fatal accident involving two bikes in Jalgaon district: Two bike riders killed जामनेर (11 मे 2025) : दोन दुचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालेतर सोबतचे दोन चिमुकले जखमी झाले. हा अपघात जामनेर तालुक्यातील टाकळी गावाजवळ शनिवारी दुपारी चार वाजता घडला. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले तर दोघा जखमींवर उपचार सुरू आहे. राहुल रामदास सुरसे (30, रा.चिखली, ता.बुलढाणा) व सुनील सुरेश पवार (35, रा.वराड, ता.जळगाव) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत.
काय घडले नेमके
सुनील पवार हा आपल्या कुटुंबासह शनिवार, 10 मे रोजी बोदवड तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे लग्नासाठी गेला वा. लग्न आटोपल्यानंतर दुपारी चार वाजता सुनील पवार हा मुलगा कार्तीक सुनिल पवार (6) व पिया सुनील पवार (8) या दोघा मुलांना सोबत घेवून बोदवड-जामनेर रस्त्याने वराड गावाकडे दुचाकीने निघाला होता. रस्त्यावरील टाकळी गावाजवळ समोरून येणार्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील पवार आणि राहुल सुरशे हे जागीच ठार झाले तर सुनीलची दोन्ही मुले कार्तीक पवार आणि पिया पवार हे जखमी झाले.
अपघातानंतर रस्त्यावरील वाहनचालकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह आणि दोन्ही जखमी मुलांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मयतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार संजय महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी हे करीत आहे.
