प्रवाशांना दिलासा : 19 तासानंतर सुरत मार्गावरील वाहतूक पूर्ववत

Relief for passengers : Traffic on Surat route restored after 19 hours भुसावळ (18 मे 2025) : गुरुवारी अमळनेर येथे घडलेल्या मालगाडी अपघातामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अखेर तब्बल 19 तासानंतर शुक्रवारी पूर्ववत झाली. सुरत मार्गावरील अप व डाऊन दोन्ही मार्ग शुक्रवारी सुरू करण्यात आले. डाऊन मार्गावरून पहिली नवजीवन एक्सप्रेस सकाळी 9.30 वाजता सुरतकडे रवाना झाली तर अप मार्गावरून पहिली गाडीही नवजीवन एक्सप्रेसच होती, जी सकाळी 10.30 वाजता आली.
दरम्यान, गुरुवारी दुपारी 2.18 वाजता अमळनेरजवळ भुसावळकडून सूरतकडे कोळसा घेऊन जाणार्या मालगाडीचे इंजिन व सात डबे रुळावरून घसरले होते. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. परिणामी, एकूण 9 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आणि 5 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. या दुर्घटनेमुळे अनेक प्रवाशांचे नियोजन कोलमडले होते. स्थानकांवर संभ्रमाचे वातावरण होते. अपघातस्थळी सुमारे 200 कामगार, रेल्वेचे अधिकारी हे थांबून होते,
पावसाने काही वेळ कामाला व्यत्यय
पाऊस आल्याने काही वेळ कामात व्यत्यय आला होता. मात्र, पाऊस थांबल्यावर पुन्हा कामाला गती आली. अपघातामुळे नादुरूस्त झालेले रेल्वे रूळ सुध्दा बदलविण्यात आले. ओएचई वायरिंगही बदल करण्यात आली. युध्दपातळीवर रेल्वे प्रशासनाकडून कामाला गती देण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरू झाली. पश्चिम रेल्वेचे बहूसंख्य वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी थांबून होते. शुक्रवारी नियमीतरित्या वाहतूक या मार्गावरून सुरू करण्यात आली आहे.
अपघाताची चौकशी होणार
गुरूवारी सूरतकडे जाणार्या या मालगाडीचे इंजिनासह सात डबे रूळावरून घसरल्याने या अपघाताची उच्चपदस्थ अधिकार्यांच्या समितीद्वारे चौकशी केली जाणार आहे. अपघात स्थळी मुंबई येथून पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. त्यांनी अपघाताचे निरीक्षण केले. असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
