खंडणी प्रकरण : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या लाचखोर कर्मचार्याचे निलंबन तर निरीक्षक ‘कंट्रोल जमा’
Extortion case: Bribery employee of Chalisgaon City Police Station suspended, inspector ‘deposited in control’ जळगाव (20 मे 2025) : पोस्कोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत टायपिंग इन्स्टिट्यूट चालकाकडून एक लाख 20 हजारांची खंडणी उकळणार्या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील हवालदार अजय पाटील या कर्मचार्याचे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबन केले आहे तर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरचा तात्पुरता पदभार चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
काय घडले चाळीसगावात
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील हवालदार अजय पाटील याने चाळीसगावातील संगणक क्लासेसचे संचालक स्वप्नील भाऊसाहेब राखुंडे (40, स्टेशन रोड, चाळीसगाव) यांच्याकडे 18 मे रोजी सायंकाळी येत निखील राठोड कोण असल्याची विचारणा केली व त्याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याचे सांगत अत्याचाराची ही घटना तुमच्या क्लासमध्ये घडल्याने तुमच्यासह भावाविरोधात गुन्हा दाखल होईल, अशी धमकी देत दोन टप्प्यात एक लाख 20 हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदारांचा आक्रमक पवित्रा
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घडल्या प्रकारानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस प्रशासनावर टीकेची तोफ डागडली व भ्रष्ट कर्मचार्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोवर पोलीस ठाणे न सोडण्याचा पवित्रा घेतला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजय पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर मंगळवारी या कर्मचार्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चाळीसगाव शहर निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
प्रकरणातील दोषींवर होणार कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी चाळीसगावातील खंडणी प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. लाच मागणार्या पोलीस कर्मचार्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
कर्मचार्याचा प्रताप : निरीक्षकांना ताप
चाळीसगावातील दोन कर्मचार्यांनी परस्पर इन्स्टिट्यूट चालकाकडे जावून खंडणी उकळल्याने पोलीस दलावर टीकेचे झोड उठली तर चाळीसगाव निरीक्षकचे कबाडी यांना मात्र नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागून त्यांना आता बदलीला सामोरे जावे लागले आहे.