भुसावळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘सावित्रीच्या लेकी ग्रुप’ व ‘गुरु चंद्रमणी बुद्ध विहार’ तर्फे सन्मान
भुसावळ (21 मे 2025) : शहरातील पंढरीनाथ नगरातील गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. ‘सावित्रीच्या लेकी ग्रुप’ आणि ‘गुरु चंद्रमणी बुद्धिस्ट बहुउद्देशीय संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी जी.बी.रायपुरे होते. यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा पवार, संगीत खरे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या गुणवंतांचा गौरव
या समारंभात रितिका सोनवणे, सम्यक गुरुचल, तनिष्क रायपुरे, प्रशिक तायडे, समृद्धी शिरसोदे, प्रेरणा साळवे, अमन साळवे, सृष्टी पोहेकर, प्रशिल पोहेकर, नैतिक मेश्राम, जयश्री मोरे, प्रसाद सोनवणे, पिनल मोरे आणि सार्थक सपकाळे या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
सूत्रसंचालन प्रिया मेढे यांनी केले तर शीला गुरुचल यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी ‘सावित्रीच्या लेकी ग्रुप’च्या सर्व महिला सदस्य, संस्थापक मंदाकिनी केदार, किशोर मेढे, नीलेश रायपुरे आणि एस. एस. केदार यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
सामाजिक बांधिलकीचा आदर्श
‘सावित्रीच्या लेकी ग्रुप’ आणि ‘गुरु चंद्रमणी बुद्धिस्ट बहुउद्देशीय संस्था’ यांनी या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचा आणि त्यांच्या शैक्षणिक यशाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. हा कार्यक्रम स्थानिक समुदायात प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सत्कार समारंभाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.