40 हजारांचे लाच प्रकरण : तामसवाडीच्या लाचखोर ग्रामसेवकाची कोठडीत रवानगी

40 thousand bribe case: Tamaswadi’s bribe-taking village servant sent to custody जळगाव (21 मे 2025) : रस्ता काँक्रिटीकरणाचे चार लाखांचे बिल अदा केल्यानंतर त्यापोटी 40 हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला (ग्रामपंचायत अधिकारी) धुळे एसीबीने अटक केली होती. आरोपीला जळगाव न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दिनेश वासुदेव साळुंखे (53, आई बंगला, भालेराव नगर, कॉटन मार्केटच्या मागे, अमळनेर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
23 वर्षीय तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार अंतर्गत मोजे तामसवाडी ग्रामपंचायतीचे रस्ता काँक्रिटीकरणाचे पाच लक्ष किंमतीचे काम घेऊन पूर्ण केले होते. या कामाचा चार लाख रुपये किंमतीचा बिलाचा धनादेश तक्रारदार यांना अदा करण्यात आल्यानंतर रक्कम खात्यात जमा झाली होती मात्र तक्रारदार व त्यांचे चुलत काका असे तक्रारदार यांनी घेतलेल्या दुसर्या कामाची चौकशी करण्याकरिता सुमारे सात दिवसांपूर्वी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यानंतर ग्रामसेवक साळुंखे यांनी यापूर्वी अदा केलेल्या चार लाखांच्या बिल रकमेच्या 10 टक्क्यांप्रमाणे 40 हजार रुपये लाचेची मागणी सोमवारी केली.
तक्रारीअंती अमळनेरात रचला सापळा
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीला दूरध्वनीद्वारे माहिती देत तक्रार दिली. पारोळ्यात तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली व लाच रक्कम अमळनेर येथे स्वीकारण्याचे आरोपी ग्रामसेवकाने मान्य केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अमळनेरातील दगडी दरवाजा समोर राजे संभाजी चौकात साळुंखे याने लाच स्वीकारली मात्र त्यास ट्रॅपचा संशय येताच त्याने दुचाकीवरून पळ काढला मात्र एसीबीने पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
बदलीनंतरही तामसवाडीत मुक्काम
विशेष म्हणजे आरोपी साळुंखे याची काही दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली असून त्यास कार्यमुक्त न केल्याने त्याचा तामसवाडीत मुक्काम असल्याची माहिती आहे.
आरोपीची कोठडीत रवानगी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी सापळा यशस्वी केल्यानंतर अधिक कारवाईसाठी आरोपीचा ताबा जळगाव एसीबीला दिला. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
