महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीसाठी बसवला डमी उमेदवार : जळगावात एकाविरोधात गुन्हा


Dummy candidate appointed for job in Maharashtra Industrial Development Corporation: Case against one in Jalgaon जळगाव (23 मे 2025) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (एमआयडीसी) नोकरी मिळवण्यासाठी एका उमेदवाराने डमी उमेदवार बसवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्जातील फोटो, प्रत्यक्ष परीक्षेतील फोटो आणि कागदपत्र पडताळणीवेळीचा फोटो यामध्ये तफावत आढळून आल्याने ही फसवणूक उघड झाली. चार वर्षांच्या चौकशीनंतर अखेर या उमेदवाराविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सरळ सेवेने 865 पदांसाठी भरती जाहीर केली होती. 17 जुलै 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 20 ते 27 ऑगस्ट 2019 दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. राहुल रोहिदास पावरा या उमेदवाराने मु.जे. महाविद्यालयात परीक्षा दिली होती.

परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सन 2021 आणि नंतर 2022 मध्ये सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. यादीतील उमेदवारांची 20 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत कागदपत्रांची छाननी करण्यात आली. याचवेळी राहुल पावरा या उमेदवाराच्या छायाचित्रांमध्ये मोठी तफावत आढळून आली. यानंतर छायाचित्रांची फेरतपासणी करण्यात आली आणि अहवाल मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आला.

प्रयोगशाळेच्या तपासणीत, उमेदवाराने भरलेल्या अर्जावरील फोटो, ऑनलाईन परीक्षा देताना असलेला फोटो आणि कागदपत्र पडताळणीवेळीचा फोटो हे तिन्ही वेगवेगळे असल्याचे निष्पन्न झाले. याचा सविस्तर एक्झामिनेशन रिपोर्ट मिळाल्यानंतर, अखेर 15 मे रोजी कारवाईचे आदेश आले. त्यानुसार, बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहायक नम्रता पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत राहुल रोहिदास पावरा याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !