धुळे रेस्ट हाऊसमधील घबाड प्रकरण : पोलिस अधीक्षकांची आयकर अधिकार्‍यांशी चर्चा ; फुटेज जप्त, अनेकांची चौकशी


Dhule Rest House incident : Superintendent of Police discusses with Income Tax officials धुळे (23 मे 2025) : धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीतून तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. ही रोकड धुळे जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विधी मंडळ अंदाज समितीच्या 11 आमदारांना देण्यासाठीच गोळा करण्यात आल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे व पदाधिकार्‍यांनी केला होता. याप्रकरणी धुळे पोलिसांकडून सखोल तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे.पी.स्वामी यांच्याशी ‘त्या’ खोलीत सापडलेल्या रकमेबाबत सविस्तर चर्चा केली. रेस्ट हाऊसमधील फुटेज जप्त करण्यात आले असून अनेकांचे जाब-जवाब नोंदवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे नेमके प्रकरण
विधी मंडळ अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना या समितीतील आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी रुपये ‘गुलमोहर’ विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये ठेवल्याचा दावा करीत बुधवार, 21 मे रोजी तब्बल चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या गंभीर आरोपाची स्थानिक प्रशासनाने दखल घेत अधिकार्‍यांच्या उपस्थितीत दालनाचे कुलूप उघडल्यानंतर दालनातून तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती.

स्वीय सहाय्यकाचे निलंबन
विधी मंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने गुलमोहर रेस्ट हाऊसमधील 102 क्रमांकाची खोली 15 मे पासून बुक करण्यात आल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी व माजी आमदार गोटे यांनी केला होता. खोलीतून मिळालेल्या घबाडानंतर सरकारने या प्रकाराची दखल घेत खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. याबाबतचे आदेश विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी काढले होते. पाटील हे गुरुवारी सायंकाळी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याकडे हजर झाल्यानंतर त्यांची चौकशीही करण्यात आली.

‘त्या’ रकमेबाबत आयकर अधिकार्‍यांशी चर्चा
धुळ्यातील रेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या रकमेवर दावा करण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याने पोलिसांनी ही रक्कम शासकीय ट्रेझरीत जमा केली आहे तर धुळे पोलीस अधीक्षकांनी शुक्रवारी आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे.पी.स्वामी यांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनेकांची चौकशी, जवाबही नोंदवले
102 क्रमांकाच्या खोलीतील रोकडबाबत पोलिसांकडून आता सखोल तपास केला जात आहे. गुलमोहरमधील स्टाफ व संबंधितांची चौकशी केली जात असून त्यांचे जाब-जवाब नोंदवले जात आहेत शिवाय पोलिसांनी तपासासाठी सहा सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. ‘गुलमोहर’ चे दोन्ही आवक-जावक रजिस्टर जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !