कोरोनाचा पुन्हा वाढला धोका : राज्यात 240 रुग्ण तर चौघांचा मृत्यू

Corona threat increases again : 240 patients and four deaths in the state मुंबई (26 मे 2025) : कोरोना हद्दपार झाल्यानंतर बिनधास्त झालेल्या नागरिकांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. राज्यात कोरोना हळूहळू पाय पसरत असून आतापर्यंत 240 रुग्णांची नोंद झाली आहे तर चार जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे या चारही रुग्णांना पूर्वीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा त्रास होता, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. राजधानी मुंबईतही कोरोनाच्या 35 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 240 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासन सजग झाले आहे. नागरिकांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार NB.1.8.1 & LF.7 हे दोन नवीन व्हेरिएंट्स दिसून येत आहेत. भारत सरकारच्या आरोग्य विभागाने 26 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सध्या देशभरात एक हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोना साथीच्या दोन मोठ्या लाटा पार पडल्यावर, जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा या आजाराने झपाट्याने पाय रोवण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 430 वर पोहोचला आहे, तर दुसर्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 209 सक्रिया कोरोन रुग्ण आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 104 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. तर कर्नाटकात 47 आणि पश्चिम बंगालमध्ये 11 कोरोनाचे सक्रिया रुग्ण आहेत.
