चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : साक्री तालुक्यातील दरोडेखोरांची टोळी जाळ्यात


Major action by Chopra Rural Police: Gang of robbers from Sakri taluka caught चोपडा (28 मे 2025) : चोपडा ग्रामीण पोलिसांनी दरोड्यापूर्वीच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दरोडेखोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. चोपडा तालुक्यातील हातेड गावाजवळ असलेल्या युग पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काय घडले नेमके
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातेड गावातील युग पेट्रोल पंपाजवळ काही दरोडेखोर दोन दुचाकीवर आले असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पथकाने बुधवार, 28 मे रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर आलेले संशयित आरोपी सोनू चक्कर चव्हाण (25), यशवंत निराधार पवार (42), धर्मा चिमण भोसले (40) व भरत निराधार पवार (38, सर्व रा.जामदे, ता.साक्री, जि.धुळे) यांना अटक केली.

आरोपींकडून चार मोबाईल, दोन दुचाकी तसेच लाल मिरचीची पावडर आणि पिवळ्या पट्ट्या असा एकूण तीन लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींकडून आणखी काही इतर चोरीचे किंवा दरोड्याचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !